हे सरकार भ्रष्ट्राचारी, आता रस्त्यावर उतरावेच लागेल; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे आत्तापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार असून या सरकारविरोधात एल्गार पुकारून आपल्याला आता रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले,  या सरकारमध्ये हर्बल तंबाखू, वसुली, स्थगिती, बदली, खंडणी यावर चर्चा होते. पण शेतकरी आणि गोरगरिबांवर चर्चा होत नाही. या सरकारच्या काळात हजारो कोटीची लूट सुरू आहे. त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरवावेच लागेल. आम्हाला कुणालाही घाबरण्याचं काम नाही. हे भ्रष्टाचारी सरकार आहे. त्यामुळे आपण नाही लढलो तर आपल्याला काळ माफ करणार नाही, असंही ते म्हणाले.

भाजप कधी दंगल करत नाही. पण आमच्या अंगावर कोणी चालून आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतानाच अमरावती मध्ये हिंदूंची दुकाने जाळली पण महाविकास आघाडीतील एक नेता तरी यावर बोलला का असा सवाल फडणवीसांनी केला.