मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) आज जन्मदिन असून चाहत्यांकडून त्याचे स्मरण केले जात आहे. अशावेळी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहत भाजपवर (BJP) निशाणा साधला. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा राजकीय उपयोग करणाऱ्या भाजपने अद्यापही त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही, असे म्हणत सचिन सावंत यांनी सुशांतसिंहला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत भाजपचा निषेध केला.
भाजपवर टीका करताना सचिन सावंत म्हणाले की, सुशांतसिंह राजपूत हा अत्यंत गुणी व होतकरू कलाकार होता. ज्या पद्धतीने त्याने या जगाचा निरोप घेतला ते अत्यंत दुर्देवी होते. परंतु, भाजप नेत्यांनी मात्र त्याच्या मृत्यूकडे राजकीय संधी म्हणून पाहत त्याचा फायदा उचलला. महाराष्ट्राची बदनामी करून बिहार विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्याकरिता त्याचा उपयोग केला. या प्रकरणात मुंबई पोलिसांसारख्या अत्यंत कर्तबगार संस्थेची बदनामी गुप्तेश्वर पांडेसारख्या व्यक्तीकडून करवली गेली. महाराष्ट्रातील नेत्यांना या प्रकरणात गोवून बदनाम करण्याचा प्रयत्नही भाजपकडून केला गेला.
केंद्र सरकारच्या अखत्यारितील तीन तीन तपास यंत्रणा या प्रकरणात आणून तपासातील तपशील लीक करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर लाखो बोगस फेसबुक आणि ट्वीटर अकांऊट उघडून सुशांतसिंहची हत्याच झाली आहे, अशा वावड्या उठवण्यात आल्या. याकामी टीआरपी घोटाळा प्रकरणी आरोप असलेल्या एका कुख्यात वाहिनीची मदतही घेण्यात आली. अद्यापही ईडी, सीबीआय आणि एनसीबी या तिन्ही तपास यंत्रणांच्या हाती काहीही लागले नाही. मुंबई पोलिसांचा तपास व्यावसायिक पद्धतीने व प्रामाणिकपणे चालला होता, हे सर्वोच्च न्यायालयाचे मत योग्य होते हे आता स्पष्ट झाले आहे, असे नमूद करत या प्रकरणी अद्यापही सीबीआय का गप्प आहे? असा प्रश्न उपस्थित करून सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या हीन राजकारणाचा तीव्र निषेध केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’