हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार ; म्हाडाच्या परीक्षेवरून भाजपचा राज्य सरकारवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकार वर निशाणा साधला आहे. तरुण – तरुणींच्या भवितव्याशी निर्दयी खेळ चालू आहे. हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकार वर टीका केली आहे.

आधी MPSC चा गोंधळ. मग आरोग्य सेवा भरती परीक्षेचा गदारोळ. आदल्या दिवशी परीक्षा रद्द केली. आता तर गृहनिर्माणमंत्र्यांनी मध्यरात्री म्हाडाची भरती परीक्षा रद्द केली. तरुण – तरुणींच्या भवितव्याशी निर्दयी खेळ चालू आहे. हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार.. अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली तसेच या सर्व परीक्षा गोंधळाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना शासन झालेच पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही सरकारला धारेवर धरले.महाविकास आघाडी सरकारला फक्त वसुली करण्यात रस आहे. त्यांना बहुजनांच्या पोरांच्या भविष्याची काळजी नाही. एक-एक पैसा गोळा करून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. आजच्या या निर्णयामुळे त्यांचा भ्रमनिरास झाल्याची टीका यावेळी पडळकर यांनी केली. परीक्षेत घोटाळा झाल्याची त्यांना पूर्वकल्पना होती, गृहखाते देखील राष्ट्रवादीकडे आहे, मग असे असतानाही परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी परीक्षा रद्द करण्याची त्यांच्यावर वेळ का आली? असा सवाल त्यांनी केला.

Leave a Comment