कोलंबो । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या शेजारी देशांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करायचा आहे, असं वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब (Tripura CM Biplab Deb) यांनी केलं होतं. दरम्यान अमित शाह यांच्या भारताच्या सीमा उल्लंघून भाजपचा विस्तार करण्याच्या स्वप्नाला श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने मोठा ब्रेक लावला आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने भारतातील राजकीय पक्षांसाठी देशाचे दरवाजे बंद असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. स्थानिक निवडणूक कायद्यानुसार परदेशी पक्षांना निवडणूक लढवण्याची परवानगी नसल्याचं श्रीलंकन निवडणूक आयोगाचे अध्यक्ष निमल पुंचीहेवा यांनी स्पष्ट केलं.
“श्रीलंकेतील कुठल्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेला परदेशातील पक्ष किंवा संघटनेची मदत घेण्याची परवानगी आहे. मात्र आमच्या निवडणूक कायद्यानुसार परदेशातील राजकीय पक्षांना इथे काम करण्याची मुभा नाही” असं श्रीलंकन निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं. अमित शाहांच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रतिक्रियेला निमल पुंचीहेवा यांनी उत्तर दिलं.
भाजपला भारताच्या सीमा विस्तारुन विचार करायला हवा, असं अमित शाह यांनी त्रिपुरा दौऱ्यात सांगितल्याचं देब यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. रवींद्र सतबर्षिकी भवनात बिप्लब देब यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना देब म्हणाले होते, ‘जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपचे अध्यक्ष होते, तेव्हा ते त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावर आले होते. आमची एका गेस्ट हाऊसमध्ये भेट झाली. तेव्हा अमित शाह म्हणाल होते, की अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहेत. आपल्याला शेजारी देशांमध्येही पक्षाचा विस्तार करायचा आहे. तिथेही विजय मिळवायचा आहे.’ असं मुख्यमंत्री बिप्लब देब भाजप कार्यकर्त्यांना सांगत होते.
‘ज्यांच्याकडे इतकी ऊर्जा आहे, असा दृष्टीकोन आहे, ते बोलत आहेत की भाजपला जगभरात विस्तार करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. असा विक्रम फक्त कम्युनिस्टांनी नोंदवला आहे.’ असंही बिप्लब देब म्हणाले. आत्मनिर्भर दक्षिण आशिया अभियानाअंतर्गत शाहांना पक्षविस्तार करायचा असल्याचं देब म्हणाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.