हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारवर भाजप मधील नेत्यांकडून अनेक कारणांनी निशाणा साधला जात आहे. भाजपचे नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे, पगारवाढ, महागाई भत्त्यात वाढ मिळावी या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. “आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर मी स्वत: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारकडे एसटी कर्मचाऱ्यांनी काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. त्यामध्ये एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे, पगारवाढ, त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
राज्यभर करण्यात येत असलेल्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर कर्मचारी बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेवून मुंबईत येतील. जर पोलिसांनी गाडी अडवली तर त्याच ठिकाणी बस सोडून कर्मचारी येतील मी स्वत: परिवहन मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन सुरु करणार आहे, असा इशारा यावेळी गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.