हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. नगर जिल्ह्यातील शेवगाव या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या केल्याची घटना घडली. यावरून सोलापूर येथे एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने ठिय्या आंदोलन केले जात आहे. यावरून भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कधीच भरोसा ठेवायचा नाही. कारण भरोसा ठेवणारा हा पक्ष नसल्याची टीका पाटील यांनी केली आहे.
भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जात आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेल्या आरोपावरून सध्या त्यांच्यावर टीका केली जात आहे. अगोदर सचिन वाजे हे भाजपचे आहेत असे बोलले आता वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत, असे बोलत आहेत. मग हायकोर्टालाही आमचा पोपट बोलणार का? असा सवाल यावेळी पाटील यांनी केला आहे.
खरं सांगायचे झाले तर बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटनाच या सत्ताधाऱ्यांना मान्य नाही. सध्या एसटी कर्मचारी, शेतकरी अडचणीत आहे. अशात राज्य सरकार त्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सांगायचे झाले तर राष्ट्रवादी कधीच भरोशाचा पक्ष नाही. सकाळी एक राजकारण, दुपारी एक आणि संध्याकाळी एक राजकारण केले जाते. राष्ट्रवादी पेक्षा काँग्रेस पक्ष परवडला. काँग्रेसमधील सगळी व्यक्तिमत्व दरोडेखोर नाहीत. राष्ट्रवादी भाजपबरोबर सलगी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या सलगी करण्याच्या डावाला भाजप कधीच फसणार नाही.