‘नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, त्यांच्याशी बोलणं सुरु आहे’- चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित असल्याची चर्चा आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंच्या प्रवेशाला अप्रत्यक्षपणे संमती दिली आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु असून लवकरच ते पुन्हा एकदा उत्साहाने सहभाग नोंदवतील असा विश्वास व्यक्त केला आहे. पुण्यात एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

एकनाथ खडसे नाराज असल्यानेचं भाजपच्या कार्यक्रमांना अनुपस्थित असतात का? असं विचारण्यात आलं असता प्रदेश कार्यकारिणीला ते दिवसभर उपस्थित होते. संध्याकाळी राष्ट्रगीत झाल्यानंतरच गेले असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

खडसेंच्या पक्षांतरावर काय म्हणाले होते पवार?
“विरोधी पक्षातील प्रभावी व्यक्ती म्हणून एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येते. एक पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, मेहनत आणि जिद्द लक्षात घेतल्यानंतर आपली नोंद घेतली जात नाही, असे वाटत असेल आणि त्यातून एका विचाराकडे माणूस जातो. जेथे नोंद घेतली जाते तेथे जावे का, असे वाटत असेल आणि एखाद्या पक्षाविषयी तसे वाटत असेल तर चांगलेच आहे,” असं म्हणत शरद पवार यांनी खडसे प्रवेशाला हिरवा कंदील दाखविला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”