हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. पवार साहेबांवर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर देत आहेत. त्यातच काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, या टीकेला चंद्रकांत पाटील यांनीही तितकेच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे.
माझं कालचं वक्तव्य हे ओबीसी आरक्षणासंदर्भातील होते. शरद पवार यांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता. पवार साहेबांबद्दल मला चुकीचे बोलायचे नव्हते. मात्र तुम्ही मोदींवर, अमित शहांवर बोललेले चालते. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणतात ते चालते, मला चंपा म्हणतात ते चालते का?’ असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर अजित पवारांनी जोरदार पलटवार केला होता. ‘शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. पवार साहेबांवर बोलण्या इतकी आपली किंमत आहे का? काहीजण अतिशय खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत,’ असं अजित पवार म्हणाले होते. त्याला आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
याआधी काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील-
शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका पाटील यांनी केली होती. राजकारणात येण्यापूर्वी पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’