मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाला आता भाजप मधूनच विरोध होत असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. भाजपचे नेते आणि पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी शिवेंद्रराजेंच्या पक्ष प्रवेशाला हरकत घेतली आहे. मी जमिनीची मशागत केली. मी पेरणी केली. मी पीक जपलं आणि आता कापणीला आलेले पीक मी कसा दुसऱ्याला कापू देईन असे मार्मिक बोल दीपक पवार यांनी शिवेंद्रराजेंना सुनावले आहेत.
आपण साताऱ्यातून विधानसभेची निवडणूक लढू शकेल म्हणून तर आपल्याला पक्षाने पद देऊन ताकद देण्याचा प्रयत्न केला. अशा अवस्थेत जर आपणाला ऐन वेळी बाजूला केलं जात असेल तर हे योग्य नाही असे दीपक पवार म्हणाले आहेत. सातारा जावळी मतदारसंघाचा भावी आमदार मीच आहे असे म्हणून दीपक पवार यांनी शिवेंद्रराजे यांना चांगलेच चित्काराले आहे.
दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील मंत्री मंडळात सामावून घेण्यासाठी भाजपमधून विरोध होत होता. त्याच प्रमाणे आगामी काळात देखील प्रस्थापित आणि आयात यांच्यात वादंग उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे नेतृत्व या वादाला सोडवण्यास कशा प्रकारे आपल्या नेतृत्वाचा कस लावते हे भविष्यात बघण्यासारखे राहणार आहे.