हॅलो महाराष्ट्र ऑनलाई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता राज्यामध्ये वाहताना दिसू लागलेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळामध्ये येणारी सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असून या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा “विचार जुळत आल्यास युती संदर्भात निर्णय घेता येईल मात्र दोन्ही पक्षांची क्षेत्रीय अस्मितेसंदर्भातील मत जुळली नाही तर मनसे सोबत युती करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सध्या तरी भाजप आणि मनसे या दोन पक्षांचे विचार जुळत नसल्याने फडणवीस यांनी या उत्तरावरून स्पष्ट केले आहे. ते एका प्रसिद्ध माध्यमाच्या मुलाखतीदरम्यान बोलत होते.
यावेळी बोलताना पुढे फडणवीस म्हणाले ‘सध्या आमच्यासोबत युतीमध्ये असणाऱ्या लहान पक्षांना घेऊन आम्ही मुंबई महापालिकेची निवडणूक लढणार आहोत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण आमचा अजेंडा व्यापक आहे. जे काही क्षेत्रीय अस्मिता असते ती आमच्याकडे आहे आम्ही महाराष्ट्राच्या हिताचाच विचार करू पण क्षेत्रीय अस्मिते सोबत आम्हाला राष्ट्रीय अस्मिता ही महत्त्वाची आहे. त्यामुळे क्षेत्रीय अस्मितेसाठी म्हणजेच मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. पण मराठी माणसावर अन्याय होऊ द्यायचा नाही यासाठी दुसर्यावर अन्याय करायचा आणि आम्ही मराठी माणसावर अन्याय होऊ देत नाही अशी भूमिका घ्यायची हे आम्हाला योग्य वाटत नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे’.