Sunday, February 5, 2023

‘नाकर्त्या सरकारचा बचाव करणं एवढचं पवारांचं काम आहे’, फडणवीसांनी घेतला पुन्हा पंगा

- Advertisement -

बारामती । कोरोनाच्या काळात घरातच राहून कामकाज करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे. ‘अनेक बाबतीत राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. त्याविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळं शरद पवारांना सरकारचा बचाव करावा लागतो. तेवढं एकच काम आता त्यांच्याकडं आहे,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून बारामतीतून अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पाहणीला सुरुवात केली. बारामती तालुक्यातील उंडवडी येथे पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतीच्या प्रश्नांसोबतच राजकीय प्रश्नांनाही उत्तरं दिली. मुख्यमंत्री मुंबईत थांबून राज्यभराचा आढावा घेत असतात. आम्हीही त्यांना माहिती देत असतो, असं पवार म्हणाले होते. त्यावर फडणवीसांनी पवारांना टोला हाणला. राज्य सरकारचा नाकर्तेपणा लपवण्याचं व सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम पवार साहेबांकडे आहे,’ असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

पवारांनी राज्यपालांवर केलेल्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. ‘राज्यपालांचं एखादं वाक्य आणि त्यावरून झालेल्या वादावर बोलण्याची ही वेळ नाही. तुमचे जे काही मतभेद आहेत, ते चालत राहतील. यापूर्वीही मतभेद झालेले आहेत. आम्हीही पाहिलंय. राज्यपाल व सरकार एकाच पक्षाचे असतानाही मतभेद झालेले आहेत. मात्र, आता तो विषय नाही. शेतकऱ्यांना काय मदत द्यायची हे महत्त्वाचं आहे,’ असं ते म्हणाले. शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री होते. केंद्राची मदत कशी मिळते हे त्यांना माहीत आहे. केंद्राचे पथक येते, राज्याचा अहवाल केंद्राकडे जातो, गृहमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्री एकत्र बसून त्यानुसार मदतीची भूमिका निश्चित करतात. असं असताना केंद्राकडे बोट का? शेतकऱ्यांना ही टोलवाटोलवी नको आहे, असंही फडणवीस म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”