मुंबई । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेवून आरोप केले होते . आरोप करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ड्राय क्लिनर असा उल्लेखही केला होता. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं असून माझ्यामध्ये खूप संयम असून, मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही असं म्हटलं आहे. सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
“एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका किंवा टिप्पणी करणार नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो की ते ज्या मनीष भंगाळे प्रकरणाबद्दल बोलतात त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही. उलट भंगाळेने त्यांच्यावर आरोप लावल्यावर मी स्वत: कमिटी तयार करुन १२ तासांत रिपोर्ट द्यायला लावला. १२ तासात खडसेंना त्यात क्लीन चीट मिळाली. भंगाळेला उचलून जेलमध्ये टाकलं, कित्येक दिवस तो जेलमध्ये होता. त्या क्लीन चीटलाही ते ड्राय क्लिनर वैगेरे म्हणत असतील तर माहिती नाही” असा टोला फडणवीस यांनी खडसेंना लगावला.
“त्यांना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या कुटुंबाने एमआयडीसीची जमीन घेतली आणि त्यांनी स्वत: बैठकी घेतल्या आणि निधी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. त्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे मी स्वत: त्यात न्यायाधीशांची कमिटी तयार केली. त्याचा रिपोर्ट आला, पण त्याच्या आधीच काही लोक हायकोर्टात गेले. कोर्टाने त्यावेळी गुन्हा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यामुळे तो गुन्हा मी दाखल केला किंवा आकसेपोटी केला असं नाही. उत्त न्यायालयाने गुन्हा दाखल करायला लावला. त्यावेळी त्यांनी मला तात्काळ रिपोर्ट गेला पाहिजे अशी विनंती केली. दोन महिन्यातच आम्ही तो कोर्टात सादर केला. पण कोर्टाने स्वीकारला नाही. तो प्रलंबित असून मान्य झाला नाही. यामुळे उगाच लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या काही तक्रारी असतील तर घरातल्या घरात चर्चा करुन त्या दूर करु असं सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेप्ठांना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे अशी माहिती दिली.
काय म्हणाले एकनाथ खडसे
मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यामुळे त्रास झाला. मला जो त्रास झाला तो फक्त फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो, असे जाहीर वक्तव्य खडसे यांनी केले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. “देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. जो आला त्याला क्लीनचीट दिली. आमचा ड्रायक्लिनरच होता. त्याच्यामध्ये असं होतं की, जो कुणी आला त्याला ड्रायक्लिनिंग करून लगेचच क्लीनचीट मिळायची. फक्त मी आलो आणि ते क्लीनचीट देऊ शकले नाहीत. म्हणजे आमच्या ड्रायक्लीनरकडे पण अशी काय कला होती, इतक्या लोकांना दिली पण मला देऊ शकले नाही. याच कारण काय?, हे विचारण्याचा मला अधिकार आहे. त्यामुळे मी ते विचारतोय,” असं म्हणत खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.