एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेवर चंद्रकांतदादा, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । उत्तर महाराष्ट्रातील काही नेते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यात भाजपचे जेष्ठ नेते खडसे यांचं नाव प्रमुख आहे. यावर ‘एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ आणि जुने-जाणते नेते आहेत. पक्षाने आतापर्यंत त्यांना भरभरून दिलं आहे. त्यामुळं भाजपचं नुकसान होईल अशी कोणतीही भूमिका एकनाथ खडसे घेणार नाहीत,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मराठा समाजाच्या राज्य सरकारनं घेतलेल्या काही निर्णयाच्या अनुषंगानं बोलण्यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी त्यांनी खडसे यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. यावेळी एकनाथ खडसे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चेबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, खडसे असं काही करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘नाथाभाऊंच्या बद्दल यापूर्वी अनेकदा अशा चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्या अफवाच ठरल्या होत्या. आताची चर्चा देखील अफवाच ठरेल,’ असं पाटील म्हणाले.

दरम्यान, भाजपमध्ये आपल्याला सातत्यानं डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यातून ते अस्वस्थ आहेत. खडसे यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ले चढवत आहेत. काल आलेले लोक आम्हाला अक्कल शिकवत आहेत, असा टोला त्यांनी काही दिवसांपूर्वी हाणला होता. ‘भाजपची सत्ता जाण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा जबाबदार आहे का याचा अभ्यास मी करतोय, असंही ते म्हणाले होते. फडणवीसांना लक्ष्य करून खडसे यांनी पक्ष सोडण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.