हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान एका क्रिकेट सामन्यावेळी भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने पंच आणि आयोजकांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
नागपूर येथील खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत छत्रपती चौकात खामला एलेव्हण आणि स्टार इलेव्हण या दोन संघामध्ये सामना सुरु होता. यातील एका संघामध्ये मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन आणि करण हे दोघे सहभागी झाले होते. सामना सुरू असताना अर्जुने थ्रो बॉलवर पंचांशी वाद घातला. यावेळी सुरुवातीला पंचांनी त्याला समजावून सांगितले. मात्र, पंचांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन निर्णयावर अडून बसला. त्याने ग्राउंडवरच गोंधळ घालायला सुरुवात केली.
नागपुरात क्रीडा महोत्सवात भाजप नेत्याच्या मुलाचा राडा; पंचांसह आयोजकांना केली मारहाण pic.twitter.com/le288rvmYY
— santosh gurav (@santosh29590931) January 21, 2023
रागाच्या भरात मुन्ना यादवच्या मुलाने पंचानाच मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच स्टेजवर खुर्च्या फेकून दिल्या. त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या समर्थकांनी मैदानात गोंधळ घातला. यामुळे सामना बंद करावा लागला. याची तक्रार आयोजक संदीप जोशी यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र, दोन दिवस उलटूनही आयोजकांनी यावर काही कारवाई न केल्याने अखेर या प्रकरणातील पीडित व्यक्तींनी आता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.