हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. “28 नोव्हेंबर खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा, असे म्हणत राणेंनी हल्लाबोल केला आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,
आज महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. ठाकरे सरकारच्या कामगिरीबाबत सांगायचे झाले तर या दोन वर्षात हिंदुत्वाशी बेईमानी, महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी, स्वतःच्या वडिलांच्या विचाराशी बेईमानी, शेतकरी, कामगार सगळ्यांशी बेईमानी करून या ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण केली आहेत. 13 प्रकरणात या सरकारला सुप्रीम आणि हायकोर्टाने फटकारले आहे.
पुरोगामी राज्य आणि उत्तम प्रशासन म्हणून महाराष्ट्राची ओळख होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी याच दिवशी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राची दोन वर्षा अगोदर असलेली ओळख हि 28 नोव्हेंबरला पुसली गेली असल्याची टीका राणे यांनी यावेळी केली आहे.