मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत शब्दात राज्यपाल कोश्यारी यांना पत्र लिहिलं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं. या पत्रव्यवहारावरुन आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. “होय, आज तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झाल्याने तुम्हाला देव भूमीतून आलेल्या राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमाणपत्राची खरी गरज आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज खरंच हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची वेळ आलेली आहे. याचे कारण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून त्यांनी केव्हाच फारकत घेतली आहे. त्यांनी त्याची प्रतारणा केली आहे. तुम्हाला हे नाकारता येणार नाही, या मुंबईवर आणि भारतावर हल्ला करणाऱ्या याकुबला फाशी झाली त्यावेळी त्याच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेतले आहे.”
“हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसलात आहात. तुम्हाला हेही नाकारता येणार नाही की, कसाबला बिर्याणी खायला घातली त्यांच्याशी तुम्ही संगनमत केले आहे. ज्यावेळी पंढरपूरला पुजेला गेलात त्यावेळी आमच्या विठूरायाच्या चरणाला स्पर्शही केला नाही हे तुम्हाला नाकारता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रमाणपत्राची खरंच गरज आहे. तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झालेय, देव भूमीतून आलेल्या राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमाणपत्राची तुम्हाला खरंच गरज आहे. ही काळाची गरज आहे,” असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. (Ashish Shelar criticize CM Uddhav Thackeray on Hindutv)
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”