हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
न्यायालयानं लक्ष घालण्यासारखे देशात अनेक विषय आहेत. शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. पंजाबमध्ये एका शिख संतांनी आत्महत्या केली आहे. पण महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत असल्याचं राऊतांनी म्हटलंय.
दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा न्यायालयाचा अवमान असल्याचं म्हणत संजय राऊतांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘कांजुरमार्ग जमीन वाद – राऊत म्हणतात, मोठं षडयंत्र!… न्यायालयाच्या निर्णयाला षड्यंत्र म्हणणे हा न्यायालयाचा अपमान (contempt of court) असून याविरुद्ध संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी…’ यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केलं आहे.
कांजुरमार्ग जमीन वाद – राऊत म्हणतात, मोठं षडयंत्र!…
न्यायालयाच्या निर्णयाला षड्यंत्र म्हणणे हा न्यायालयाचा अपमान (contempt of court) असून याविरुद्ध संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी… pic.twitter.com/cop1WuA6st— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 17, 2020
नक्की काय आहे प्रकरण –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’