सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. फलटण जवळील पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बानगंगा नदीच्या पुलावरुन 30 फूट खोल नदीत कोसळली. त्यावेळी गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. त्यातील गाडीमधील 2 जण गंभीर तर इतर 2 दोघे किरकोळ जखमी आहेत.
गंभीर जखमी असणाऱ्या दोघांना उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आले आहे. तर इतर दोघांवरही फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आ. जयकुमार गोरे यांच्या छातीला मार लागल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हाॅस्पिटलला हलवण्यात आले आहे.
भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात, नदीच्या पुलावरुन गाडी 50 फूट खोल दरीत कोसळली pic.twitter.com/tXihCA1UnO
— santosh gurav (@santosh29590931) December 24, 2022
आमदार गोरे हे पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना अपघाताची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सध्या रुबी हॉल येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल , खासदार रणजित निंबाळकर उपस्थित आहेत.
जयकुमार गोरेंची प्रकृती स्थिर : डॉक्टर
रुबी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे यांनी माध्यमांशी संवाद साधत गोरे यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. ते म्हणाले कि, आमदार गोरे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या छातीच्या डाव्या बाजूला मुक्का मार बसला आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे.