सातारा । राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टातही टिकवलं, पण हे सरकार आरक्षणात खोडा घालतंय, अशी टीका भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज केली. ते साताऱ्यातील आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. या फाऊंडेशनचे संस्थापक नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर उपस्थित होते.
आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे कार्य हे मराठा समाज एकत्र आणण्यासाठी होणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. नरेंद्र पाटील यांना आपण साथ दिली पाहिजे, असं शिवेंद्रराजे यावेळी म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावं लागेल. फडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टातही टिकवलं होतं. नंतर हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात गेलं. पण मात्र राज्य सरकारला ते टिकवता आलं नाही, असं ते म्हणाले.
राज्य सरकार जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाला खोडा घालण्याचं काम करत आहे. आरक्षणावरून टोलवाटोलवी सुरू आहे. खरं तर याला जबाबदार आपणच आहोत. कारण आपल्यात एकी नाही, असंही ते म्हणाले. एखाद्या पक्षाचा सदस्य म्हणून मी बोलत नाही. ही माझी भावना आहे, असंही शिवेंद्रराजे यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’