शरद पवारांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावतांना हजारदा विचार करावा! पडळकरांचा धमकीवजा इशारा

पुणे । जेजुरी संस्थानच्या वतीनं जेजुरी गडावरील पायरी मार्गावर अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण सोहळा उद्या दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होता. मात्र, भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही कार्यकर्त्यांसह आज पहाटेच हा सोहळा उरकून टाकला. यानंतर एक व्हिडिओ ट्वीट करून पडळकर यांनी पुन्हा पवारांवर कडवट शब्दांत टीका केली आहे.

”शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं हे खरं आहे. मात्र, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी व जातीयवादी माणसानं अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावू नये, अनावरण करू नये, अशी महाराष्ट्रातील वडिलधाऱ्यांची व युवकांची भावना होती. त्यामुळं आम्हीच हा सोहळा पार पाडला” असल्याचे पडळकर यांनी म्हटलं.

”अहिल्यादेवी आणि आपल्या विचारात तफावत आहे हे शरद पवार यांनी समजून घ्यावं आणि यापुढच्या काळात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावताना हजारदा विचार करावा,” असा धमकीवजा इशाराही पडळकर यांनी आपल्या व्हिडिओत दिला.

अहिल्यादेवी यांचं काम अखंड भारतात आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांचं काम आहे. शरद पवार यांची प्रतिमा बरोबर उलटी आहे. अहिल्यादेवी प्रजा हित दक्ष होत्या. पवार नेमके प्रजेच्या विरोधी आहेत. त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होणं म्हणजे अहिल्यादेवींचा अपमान आहे, अशी कडवट टीका पडळकर यांनी यावेळी केली.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like