हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यातील आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली.
नारायण राणे आज कोकणात होते यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यात अनेक प्रश्न आहेत. तरीही या सरकारला त्याचं काही पडलं नाही. हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार आहे, अशी टीका राणेंनी केली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळ आले, अतिवृष्टी झाली तरी दखल घेतली जात नाही. पुरेसे पैसे दिले जात नाहीत. आता कुठे निधीचे वाटप होणार आहे. जिल्हा नियोजनाची बैठक ही निव्वळ औपचारिकता आहे. जानेवारीनंतर बैठक होत आहे. विकासाला चालना मिळेल असे बजेट या नियोजन समितीकडे नाही. आधी पैसे जाहीर करायचे आणि नंतर मागून घ्यायचे असे या सरकारचे धोरण आहे. जिल्हा परिषदेसाठी सरकारने 46 कोटी रुपये दिले होते. मात्र, विभागीय चौकशीची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्याकडून तो निधी परत मागवून घेतला, असा गंभीर आरोप राणेंनी केला.