हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde BJP Offer) यांना भाजपने ऑफर दिली आहे. स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी हा खुलासा केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. मात्र आपण काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नाही असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माझा दोन वेळा पराभव झाला आहे तरीही मला आणि प्रणितीला भाजपमध्ये या, अशी ऑफर आहे. पण आता ते कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो. जिथे आमचं बालपण आणि तारुण्य गेलं. त्याला कसं विसरायचं? आता मी 83 वर्षांचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं म्हणणं बरोबर आहे का ? हे असं कसं म्हणणार? तुम्हाला हेही माहिती आहे की, मी आणि प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही, असे स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदे यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, राजकारणामध्ये हार-जीत होत राहते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत असं झालं. त्यांचाही पराभव झाला होता. त्यावेळी नेहरू म्हणाले होते की, ‘लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो मग पुन्हा उठतो, पुन्हा पडतो पुन्हा उठतो. परंतु नंतर तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही’. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत, मात्र ते दिवस निघून जातील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
शिंदेंच्या विधानावर नाना पटोले काय म्हणाले??
सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला भाजपने ऑफर दिली होती याचा खुलासा करताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी किती हापापलेली आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यांच्याकडे स्वतःची लोकं नाहीत. त्यांच्या पक्षातील 60 ते 70 टक्के लोकं काँग्रेस पक्षातून गेली आहे. मात्र, त्यांना सुशीलकुमार शिंदे यांनी योग्य उत्तर दिले असं नाना पटोले म्हणाले.