सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्यात महावितरण कडून वारंवार केल्या जात असलेल्या लोडशेडिंग विरोधात भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या वतीने सातारा येथील पोवई नाका परिसरात कंदील आणि मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधही करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली.
गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या वतीने लोडशेडिंग केले जात आहे. याचा परिणाम उद्योग धंद्यांवर होत आहे. या वारंवार केल्या जात असलेल्या लोड शेडींग तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी सायंकाळी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच भ्याड हल्ले बंद जर झाले नाहीत तर ईट का जवाब पत्थर से’ देण्यात येईल. आणि जशास तसे उत्तरही देण्यात येईल. जोपर्यंत हे बंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सातारा येथील पोवई नाका परिसरात एकत्रित येत मेणबत्त्या व कंदील पेटवून महा महावितरण व महा विकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तिघाडी सरकारकडून लोकांना वेड्यात काढायचे काम सुरु – पावसकर
यावेळी भाजप नेते विक्रम पावसकर यांनी महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, आज अखंड महाराराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक मंडल या ठिकाणी या तिघाडी सरकारने ज्या प्रकारे लोड शेडिंगची सुरुवात केलेली आहे. त्याच्या निषेधार्थ आजचा कंदील मोर्चा काढण्यात आलेला आहे. कोळसा शिल्लक असतानाही कोणते तरी देखभाल दुरुस्तीचे कारण पुढे करायचे आणि लोकांना वेड्यात काढायचे. हे तिघाडी सरकारचे काम चालू आहे. ज्या पद्धतीने गेली तीन ते चार आठवडे या सरकारने दीड तास ते सहा तास भर नियमन चालू केलेले आहे. त्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबाचे भरपूर हाल होत आहेत, अशी टीका विक्रम पावसकर यांनी यावेळी केली.