हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी संकटात असून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकार हे रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू पुसणार,” अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानीच्या मदतीबाबत बोलण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करुन आपले अपयश झाकण्यासाठी विषय दुसरीकडे नेत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.
चक्रीवादळ असो, कोरोना असो, अतिवृष्टी -गारपीट असो किंवा महापूर अशा सर्वच काळात कधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार, कधी बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस तर कधी राज्यपाल आणि मुख्यमंत्री असे विविध वाद निर्माण करुन जनतेचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
दरेकर पुढे म्हणाले, “निवडणुकीपूर्वी जी गारपीट झाली होती तेव्हा बांधावर जाऊन हेक्टरी 25 आणि 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी ठाकरे करत होते. आता तर त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली असताना उद्धव ठाकरे यांनी वाचन पाळावे आणि तात्काळ पंचनामे न करता मदत द्यावी,” असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावला. “तुमची जबाबदारी आधी पूर्ण करा आणि मग केंद्राकडे बोट दाखवा असे सांगताना ज्यांच्याकडे मदत मागायची त्यांच्यावर टीका, ही दुटप्पी भूमिका जनतेला कळते. केंद्र सरकार त्यांची जबाबदारी पूर्ण करणारच आहे पण तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवून जबाबदारीतून पळू नका,” असं दरेकर यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’