हिंदुत्त्वावरून भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; केले गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात हिंदुत्त्वाच्या मुद्दावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावं. त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं, मी माझं वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो असं म्हणत त्यांनी भाजपला खुलं आव्हान दिले होते. यांनतर भाजपने ठाकरेंवर पलटवार करत काही गंभीर आरोप केले आहेत.

भाजपने ट्विट करत म्हंटल की, मंदिरात पूजेला जाऊन कपाळी टिळा न लावता ‘बोडक्या’ कापळाने बाहेर पडणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. संत सेवालाल महाराजांचा प्रसाद जमिनीवर टाकणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्व शिकण्याची गरज भाजपला नाही.

देवाच्या गाभाऱ्यात श्वास गुदमरत आहे, असं म्हणत, पूजा अर्धवट सोडणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या वडिलांकडून हिंदुत्व शिकण्याची गरज भाजपला नाही. जो व्यक्ती मुलाला हिंदुत्वाचे संस्कार देऊ शकत नाही. तो हिंदुत्ववादी होऊच शकत नाही. मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्या आतंकवाद्यांची फाशी रद्द व्हाव्ही म्हणून पत्र लिहणाऱ्या असलम शेखला पालकमंत्री बनवणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही असं भाजपने म्हंटल.

देश विरोधी PFI ला कोविड काळात अंत्यविधी करण्याचे कंत्राट देऊन आर्थिक ताकद देणाऱ्याकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. आतंकवादी दाऊद सोबत व्यवहार करणाऱ्या नवाब मालिकला पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून भाजपला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. हिंदूं धर्माबद्दल गरळ ओकणाऱ्या जिहादी शरजिल उस्मानीला पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही असा हल्लाबोल भाजपने केला.

अमरावतीत केमिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करणाऱ्या जिहाद्याना पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्व शिकण्याची भाजपला गरज नाही. हिंदूंच्या सणांना प्रतिबंध घालणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून भाजपला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही अशा शब्दात भाजपने ठाकरेंच्या भाषणावर पलटवार केला आहे.