हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. हे पांढऱ्या पायाचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं असा घणाघात सदाभाऊंनी केला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र हे करंटे पांढऱ्या पायाचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं. राज्य सरकारने कोर्टात योग्यरित्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांना सोबत घेतलं नाही, वकिलांना मार्गदर्शन केलं नाही. गायकवाड समितीमधील महत्वाचे पुरावे जोडले नाही, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली आहे.
अशोक चव्हाणांचा आदर्श घेण्यासारखा आहे, असा टोला मारत चव्हाण वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत असल्याचं खोत म्हणाले. तुम्ही 2 वर्ष काय अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होता का असा सवाल सदाभाऊंनी केला. तसेच प्रस्थापित मराठा नेत्याला आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.