सांगली । भाजपला शेतकरी हा पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू वाटतोअशी घणाघाती टीका महसूलमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यश बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे. केंद्र सरकारने नव्यानं आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीनंतर बाळासाहेब थोरातांनी कृषी कायद्याला विरोध करत भाजपाला धारेवर धरले.
मोदी सरकारने परदेशातून कांदा आयात करायला सुरवात केली. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे आज देशातील भाजप सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी मोठा शत्रु वाटतो. दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना केंद्र सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेते. दूध भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. तशातच कृषी विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळेच कायद्याविरोधात काँग्रेसने एल्गार केला आहे असं थोरात यांनी म्हटलं.
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा राज्य तापून उठले आहे . तेथे आजही आंदोलन सुरू आहे. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना चिमटा बसला नसला तरी धोका कायम आहे. आज शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली . याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची अशी टीका थोरात यांनी केली.
केंद्र मूठभर लोकांसाठी काम करत आहे. केंद्र सरकारने धर्माचे नाव घेऊन भेदभाव करायचा, आपली पोळी भाजायची…पाहिजे तेवढा अन्याय जनतेवर करायचा, जनता काही बोलत नाही. पण हे आता चालणार नाही असा इशारा थोरात यांनी व्यक्त केला. राज्यात आता काँग्रेसची लाट येणार आहे. संपूर्ण राज्यात अनेक मंडळी काँग्रेस मध्ये येणार असून राज्यात काँग्रेसचे राज्य निर्माण झालेले दिसेल असे संकेतही प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in