Breaking| अखेर आज झाली युतीची घोषणा ; जागा वाटपाचा सस्पेन्स कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजपची युती आज झाल्याचे पत्रकाच्या मार्फत सेना भाजपच्या वतीने घोषित करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रित पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करतील असे बोलले जाते होते. मात्र युतीची घोषणा एका पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

युतीची घोषणा जरी करण्यात आली असली तरी जागा वाटपाचा सस्पेन्स दोन्ही पक्षांकडून कायम ठेवण्यात आला आहे. भाजप आणि शिवसेना किती आणि कोणत्या जागांवर लढणार हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सहीने पत्रक काढून युतीवर शिक्का मोर्तब करण्यात आले आहे.

काय सांगते युतीच्या घोषणेचे पत्रक

राज्यात गेली ५ वर्ष यशस्वीपणे राज्यकारभार करीत महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेण्याचे काम महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात केले आणि आता लोकशाही परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मित्रपक्षांचे नेते सर्वश्री केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्याच झालेल्या चर्चेअंती महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक ही महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यानुसार आम्ही महायुतीची घोषणा करीत आहेत.

या महायुतीत कोणता पक्ष कोणती व किती जागा लढविणार, इत्यादी तपशील लवकरच जाहीर केला जाईल. ही महायुती महाराष्ट्रामध्ये राज्यातील जनतेचा अभूतपूर्व आशीर्वाद प्राप्त करेल, हा विश्वास आम्ही व्यक्त करीत आहोत.

WhatsApp-Image-2019-09-30-at-7.41.49-PM