संभाजीराजेंना भाजपने अपक्ष तिकीट द्यावे : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

छ. संभाजीराजे यांना राज्यसभेला अपक्ष पाठिंबा देण्याचा प्रश्न हा प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक आहे. महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या भाजपने तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः च्या पक्षाच्या कोट्यातून अपक्ष म्हणून संभाजीराजेंना तिकीट दिले तर स्वागत करेन. एवढेच नाही तर सुधीर मुनगंटीवार यांना हार घालेन असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत काॅंग्रेसची भूमिका स्पष्ट केली. छ. संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केले आहे. तेव्हा महाविकास आघाडी सरकारचा प्रश्न नसून हा प्रत्येक पक्षाचा वेगळा असल्याचे यावेळी माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा काहीही संबध नाही, वैयक्तिक प्रश्न आहे. राज्यसभेला 6 जागा आहेत. काॅंग्रेसच्या वाट्याला आलेली जागा आता जाहीर होईल. शिवसेना पक्षाला 2 जागा असून त्याचा निर्णय पक्ष घेईल. राष्ट्रवादी पक्षाला 1 जागा आहे. तेव्हा हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही. प्रत्येक पक्ष आपण कुणाला तिकीट द्यायचे तो त्याचा प्रश्न आहे. छ. संभाजीराजेंचा अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय आहे, तेव्हा भाजपने त्यांना पाठिंबा द्यावा.