अखेर कराडचा जुना पुल चारचाकी वाहनासांठी आजपासून सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरात ये- जा केवळ दुचाकी वाहनांना सुरू असलेला ब्रिटीशकालीन जुन्या कोयना नदीवरील पूलावरून अखेर चारचाकी हलक्या वाहनांच्या वाहतुकीला आजपासून सुरुवात करण्यात आली. माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या वाहतुकीचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे आता चारचाकी व रिक्षा वाहतूक सुरू होणार असल्याने काही प्रमाणात कोल्हापूर नाका मोकळा श्वास घेईल.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जुन्या कोयना पुलाचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध केला होता. गेल्या दोन वर्षात या पुलाचे मजबुतीकरण करण्यात येऊन पूलाचे टेस्टिंग करण्यात आले होते. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम करण्यात आले. या पुलावरून चारचाकी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने कोल्हापूर नाका परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आजपासून सुरूवातील हलकी वाहने जातील. जुना पूल सुरू झाल्याने कराड शहरात जाणाऱ्या वाहतूकीवरील भार हलका होईल. दुचाकी वाहने सुरू होती, आता चारचाकी वाहने धावतील, त्यामुळे कराडकरांची एकाप्रकारे सोय झाली आहे. राज्यातील नव्हे तर देशातील एक उत्कृष्ठ नमुना आहे. ब्रिटीशांनी 150 वर्षापूर्वी बांधलेला पूल पुन्हा सुरू झाला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी केलेले काम वाखाण्याजोगे आहे. कारण अनेक पूल पाडले जातात.

आज सकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जुन्या कोयना पूलावरील वरील हलक्या वाहनांच्या वाहतुकीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, इंद्रजीत चव्हाण, मनोहर शिंदे, नामदेव पाटील, हिंदूराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.