हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मंदिरे आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भाजप व भाजप अध्यात्मिक आघाडीने आक्रमक पावित्रा घेतली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी राज्य सरकारला फक्त बार मालकांच्या नोटांचाच आवाज येतोय. त्यांना मंदिरातील घनटांचा आवाज यावा यासाठी घटानाद आंदोलन केले जात असल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला.
भाजपातर्फे राज्यात आज नाशिक, पुणे, पंढरपूर, नागपूर येथे मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन केले जात आहे. यावेळी भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून आंदोलनात सहभाग घेतला जात आहे. आज कसबा बावडा येथील आंदोलनादरम्यान चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही कुलूप तोडून मंदिरे खुली करणार आहे. उद्धव ठाकरे तुमचे आता पुरे झाले. तुम्ही बाकीच्या गोष्टी खुल्या करताय. मात्र, मंदिरे का करत नाही. आता भाजपकडून मंदिरे खुली केले जाणारच आणि नागरिकांनीही आपली भावना दाबून न ठेवता मंदिरात दर्शन घ्यावे, असेल आवाहन प्रदेशाध्यक्ष पाटलांनी केले.
राज्यभरात भाजप व भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून केल्या जात असलेल्या मंदिर खुले करण्याच्या आंदोलनास कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाच्या दबावामुळे सरकार आज संध्याकाळपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश देईल, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले आहे. दरम्यान, या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेतली जावी, असे आवाहन भाजपकडून केले जात आहे.