नवी मुंबई | गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला अगदी काटावरचे बहुमत आहे. त्यामुळे या ठिकाणचे १३ नगरसेवक भाजपमध्ये सामील करण्याच्या [प्रक्रियेला वेग आला आहे. या संदर्भात या नगरसेवकांनी बैठक घेऊन १५ ऑगस्ट पूर्वी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव बघून राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी गुप्त बैत्यहंका देखील घेतल्या आहेत. येत्या मार्च महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी हे नगरसेवक भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास आहे. त्यामुळे नगरसेवक असा निर्णय घेऊ शकत नाहीत. अशी बैठक झाली असती तर ती आम्हाला नक्कीच समजली असती. त्यामुळे अशी बैठक झालेली नाही. जर बैठक झाली असेल तर ती गटारी अमावस्येच्या पार्टी साठी झाली असेल. असा अजब युक्तिवाद जिल्हाध्यक्षांनी मांडला आहे.