कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे भारतातील सर्व जनतेच्या भावना संतप्त झाल्या आहेत. त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. दरम्यान, आज कराड येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड येथील दत्त चौकात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेस जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली.
कराड येथे भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, भाजपाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात कार्यकर्त्यांनी मुर्दाबाद मुर्दाबाद…पाकिस्तान मुर्दाबाद…,मोदीजी तुम आगे बडो… हम तुम्हारे साथ है…, भारत माता की जय…, वंदे मातरम… पाकिस्तानच्या विदेशी मंत्र्यांचा धिक्कार असो…अशा निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच भुट्टो यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही केली.
“मोदींच्या माध्यमातून जगात सर्वत्र भारताचे नाव उंचावत असताना, दहशतवाद्यांचा अड्डा असणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने केलेले विधान निंदनीय आहे. भविष्यात अशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला भारताकडून जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशारा विक्रम पावसकर यांनी यावेळी दिला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, युवा मोर्चाचे सुदर्शन पाटसकर, मुकुंद चरेगावकर, घनश्याम पेंढारकर, धनाजी माने, उमेश शिंदे, प्रमोद शिंदे, सीमा घार्गे, सारिका गावडे, शामबाला घोडके, स्वाती पीसाळ, मंजीरी कुलकर्णी, दैवशीला मोहिते, शीतल कुलकर्णी, धनश्री रोकडे, सुरेखा माने, नितीन शहा, राजु मुल्ला, विश्वानाथ फुटाणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकडही केली.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/713929746625350
भुट्टोनी आपल्या देशाचीही लाज वेशीवर टांगली : अतुल भोसले
यावेळी डॉ. अतुल भोसले म्हणाले की, या भरड देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद मोदी यांचे जगात मानाचे स्थान आहे. त्यांच्याविषयी सर्वांना अभिमानही आहे. आणि अशा लोकप्रिय पंतप्रधानमंत्रीविषयी चुकीच्या पद्धतीचे विधान केल्यामुळे देशातील सर्व नागरिकांनी याचा धिक्कार केला आहे. भुट्टो सारख्या अपरिपक्क माणसाने आपल्या देशाचीही लाज वेशीवर टांगली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या माणसाला जगात कुठेही किंमत नाही.
बिलावल भुट्टो नेमकं काय म्हणाले?
संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या विधानावर प्रतिक्रीया देताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या बाबत एक वक्तव्य केले. भुट्टो म्हणाले, ओसामाबीन लादेन तर मारल्या गेला पण गुजरातचा कसाई मात्र अजूनही जिवंत आहे आणि तो कसाई आज भारताचा पंतप्रधान आहे.