भाजपच्या आ. शिवेंद्रराजेंची खेळी अयशस्वी : अध्यक्षपदी नितिन पाटील तर अनिल देसाईंना उपाध्यक्ष पदाची लाॅटरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या निमीत्ताने साता-यात राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. यामध्ये एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुद्धा पहायला मिळाले, जिरवाजिरवीचे राजकारणही दिसून आले. मात्र संचालक निवडणूकीनंतर जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार? यावर बरेच दिवस खलबतं सुरु होती. अध्यक्षपदासाठी अनेकांनी फिल्डींग लावली होती. मात्र आज अध्यक्षपदाच्या निवडी दिवशी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक झाली. यामध्ये अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर चर्चेत असणारे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याऐवजी चर्चेत असलेलेच नितिन पाटील यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी चर्चेत नसलेले नाव अनपेक्षितरित्या अनिल देसाई यांची बिनविरोध निवड झाली.

आज अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी अगोदर झालेल्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, नितीनकाका पाटील, प्रभाकर घार्गे इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत निर्णय घेवुन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या नावावर मोहर उठवण्यात आली.

बैठकीत भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे नेते नितीनकाका जाधव- पाटील यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले. तर उपाध्यक्षपदी प्रबळ दावेदार पाटणचे सत्यजित पाटणकर यांच्यासह दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजापुरे यांची नांवे चर्चेत होती. मात्र ऐनवेळी उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांंच्या नावावर सहमती झाली. निकालापासून अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाला विरोध होत होता. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अजितदादा पवार आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र जिल्ह्यातल्या विरोधाची हवा पाहता तसेच राष्ट्रवादी मधूनच असलेला विरोध यामुळे शरद पवार यांचा याठिकाणी नाईलाज झाल्याचं पहायला मिळालं. शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर आणि बाळासाहेब पाटील सोबत चर्चा करुन दोघांच्या खांद्यावर पुढील जबाबदारी सोपवली होती. रामराजेंनी स्वत:ची खेळी खेळत शिवेंद्रराजेंची मनधरणी करत राष्ट्रवादीचाच संचालक अध्यक्ष बनविला.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत जिल्ह्यातील मुख्य नेत्यांनी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र शशिकांत शिंदेंचा जिल्हा बँकेतील पराभव आणि आमदार मकरंद पाटील यांचा शिवेंद्रराजेंच्या नावाला झालेला विरोध हाच आमदार शिवेंद्रराजेंच्या अध्यक्षपदासाठी विरोध ठरला, अशीच चर्चा आता जिल्ह्यातील राजकीय गोटात होवू लागली आहे.