हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. विधिमंडळात आज मतदान प्रक्रिया पार पडली असता राहुल नार्वेकर याना भाजप आणि शिंदे गट यांची एकत्रित मिळून तब्बल 164 मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या राजन साळवी याना फक्त 107 मते मिळाली त्यामुळे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत.
मतदानावेळी शिंदे गटाने शिवसेनेच्या व्हीपचे पालन न करता आपली सर्व मते राहुल नार्वेकर यांच्या पारड्यात टाकली.तसेच बहुजन विकास आघाडी आणि मनसेने देखील राहुल नार्वेकर याना मतदान केलं. तर समाजवादी पक्षाने तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेना उमेदवार राजन साळवी यांचा थेट पराभव झाला.
कोण आहेत राहुल नार्वेकर-
राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता भाजप असा आहे. 2019 त्यांनी कुलाब्यातून विधानसभा निवडणुक लढवली आणि ते आमदार झाले. राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. रामराजे हे सध्या विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेचे अध्यक्ष पदी जावई आणि सासऱ्यांचे राज्य आहे.