विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक चांगलीच गाजली. अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाने जादुई आकडा गाठत आपला तिसरा उमेदवारही निवडूण आणण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील फुटलेली अपक्षांची मते ही कशी गेली यांचा अभ्यास केला जाईल. या विजयाने कोल्हापूरच्या महाडिक गटात चैतन्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. भाजपच्या गोट्यात या विजयानंतरही खुशी है ! लेकीन गम भी है ! अशी अवस्था असल्याचे पहायला मिळत आहे.
राज्यसभेच्या निवडणूक जाहीर होण्यापासून निकाल लागेपर्यंत अनेक ट्विस्ट या निवडणुकीत पहायला मिळाले. कोल्हापूरच्या छ. संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीपासून सुरू झालेला घोळ हा कोल्हापूरच्याच पैलवानाच्या जय- परायजयाने निकालपर्यंत थांबला आहे. छ. संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्यावरून शिवसेनेची स्पष्ट भूमिका होती. तर भाजपाने वरिष्ठाच्या कोर्टात चेंडू ढकलू असे सांगितले, तोपर्यंत भाजपाला अडचणीची न ठरणारी माघारीची भूमिका छ. संभाजीराजे यांनी घेतली. परंतु यावेळी शिवसेनेच्या उघड भूमिकेमुळे नाराजी अोढावून घेतली.
राज्यसभेच्या निवडणुकीत छ. संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याचा विषय संपताच शिवसेनेने कोल्हापूरच्याच संजय पवार यांना उमेदवारी घोषित केली. याचवेळी भाजपानेही कुस्ती रंगतदार करण्याच्या उद्देशाने बहुमताचा आकडा कमी असताना कोल्हापूरचेच मैदान निवडले अन् सर्वच बाजूने मजबुत असलेला धनंजय महाडिक हा पैलवान मैदानात उतरवला. खरे तर येथे ठराविक मतदान असल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना विजयाची मिळविण्यासाठी धनंजय महाडिक हेच योग्य उमेदवार होते.
केंद्र सरकार आणि राज्यात भाजपाला महाराष्ट्रातून सवाल- जवाबमध्ये शिवसेनेचे संजय राऊत हे जोरदार टक्कर देत आहेत. अशावेळी राज्यसभेतून संजय राऊत यांचा पत्ता कट करण्यासाठी भाजपाने मोठी खेळी केली होती. त्यादृष्टीने भाजपाने पाऊले टाकत अनेकदा एका संजय पराभव होणार असे वारंवारं सांगितले जात होते. निकालतून तसेच झाले, एक संजयचा पराभव झाला, मात्र तो भाजपाला पाहिजे होता, तो नाही. कारण संजय पवार यांचा नव्हे तर भाजपाला संजय राऊताचा पराभव पाहिजे होता. त्यामुळेच भाजपच्या गोट्यात या विजयानंतरही खुशी है ! लेकीन गम भी है ! अशी अवस्था झाली आहे.