मुंबईकरांवर आली घर सोडण्याची वेळ; BMC ने पाठवल्या नोटीसा?

Mumbaikar shifting
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळाला. रस्त्यावर पाणी आलं, जनजीवन विस्कळीत झालं. याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना आपलं राहत घर सोडून दुसरीकडे स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. विक्रोळी आणि घाटकोपर पश्चिम (एन वॉर्ड) येथे भूस्खलनाच्या शक्यता असलेल्या डोंगराळ भागातील झोपडपट्टीवासीयांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन बीएमसी कडून करण्यात आलं आहे.

पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यादरम्यान, दरवर्षी शहरातील डोंगर उतारावर बांधलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये घरे कोसळणे, भूस्खलन होणे, पूर येणे अशा अनेक घटना घडतात. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (GSI) ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि इतर ठिकाणी भूस्खलनाच्या बाबतीत सर्वाधिक संवेदनशील क्षेत्रे ओळखली गेली आहेत. तसेच या वर्षी, महापालिकेने विक्रोळीच्या पार्कसाईट, वर्षा नगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी. आझाद नगर, प्रेम नगर, आनंद नगर यासारख्या एन वॉर्डमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असलेली घरे म्हंटली आहेत. या सर्व ठिकाणी डोंगराळ परिसर असून इथे मोठ्या प्रमाणावर झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. डोंगराच्या उताराशी असलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने लोक वास्तव्यास आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्यास बीएमसीने सांगितलं आहे.

एन विभाग कार्यालयाने वर उल्लेख केलेल्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना सावधानतेच्या सूचना / नोटीस आधीच दिल्या आहेत. तरीही जो कोणी बीएमसीच्या सूचनांचे पालन करणार नाही आणि स्थलांतरित होणार नाही, त्यांनी होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी स्वतः घ्यावी. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या कोणत्याही अपघातासाठी किंवा जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानासाठी बीएमसी जबाबदार राहणार नाही असेही बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पूर्व-मध्य अरबी समुद्रात, कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे 22 ते 24 मे दरम्यान कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई आणि परिसरात 23 मे रोजी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून मुंबई महानगर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.