मुंबई । मुंबई महापालिकेने (bmc) मुंबईकरांना मास्क लावणं बंधनकारक (mask compulsory) केलं आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांना १ हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले असून तसं परिपत्रकच जारी करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी जाताना, प्रवास करताना किंवा घराबाहेर पडल्यावर तसेच खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. मास्क न लावता घराबाहेर पडल्यास आणि लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्यास १ हजार रुपये दंड वसूल केला जाणार असल्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथील करुन पुनश्च हरिओम अर्थात मिशन बिगीन अगेनची घोषणा केली आहे. केंद्र व राज्य सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणताना देण्यात येत असलेल्या सवलतींची अंमलबजावणी करताना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारलेली नाही. नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन कोविड १९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा संसर्ग वाढू शकतो, असे वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. मात्र तरीही काही नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याने त्यांची वैयक्तिक व इतरांचीही सुरक्षितता धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मंजुरीनिशी आज (दिनांक २९ जून २०२०) परिपत्रक प्रसारित करण्यात आले आहे.
सार्वजनिक जीवनात वावरताना मास्क लावणे हे अतिशय गरजेचे असून त्यामुळे संसर्गाला आटोक्यात ठेवणे शक्य आहे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर बाळगून व मास्क लावून वावरल्याने संसर्गाचा धोका अत्यल्प असतो, असे अभ्यासकांनी वारंवार नमूद केले आहे. मात्र तरीही काही नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याने त्यांची वैयक्तिक व इतरांचीही सुरक्षितता धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, मास्क न लावणाऱ्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले असून तसं परिपत्रकच त्यांनी काढलं आहे.
या निर्देशांनुसार, कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानादेखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल.
प्रमाणित (स्टँडर्ड) मास्क, तीन स्तरांचे (थ्री प्लाय) मास्क किंवा औषधी दुकानदारांकडे उपलब्ध असलेले साध्या कापडाचे मास्क यासह घरगुती तयार केलेले, निर्जंतुकीकरण करुन वारंवार वापरात येणारे मास्क यांचाही उपयोग नागरिक करु शकतात. महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या या निर्देशांचे उल्लंघन करणाऱयांवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल. अशा प्रत्येक उल्लंघनासाठी रुपये एक हजार इतका दंड आकारण्यात येईल. पोलीस विभाग तसेच महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱयांना ही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”