अभिनेता सोनू सूद आला मजुरांच्या मदतीला धावून, केली अशाप्रकारे मदत..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशातील विविध भागातून राज्यांत कामासाठी आलेल्या परप्रांतातील कामगारांना या लॉकडाउनचा फटका बसला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या भागात इतर राज्यातील अनेक मजूर कामासाठी येत असतात. मात्र लॉकडाउनमुळे अनेक दिवस हाताला काम नाही आणि खायला अन्न नाही अशा अवस्थेचा मजुरांना सामना करावा लागला. दरम्यान केंद्र सरकारने कामगारांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली, पण प्रत्येकाला रेल्वेचा प्रवास परवडणारा नाही.

मुंबईतल्या अशाच परप्रांतीय कामगारांसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सुद धावून आला आहे. कर्नाटकातील कामगारांसाठी सोनू सुदने १० खासगी बस गाड्यांची सोय केली आहे. सोमवारी ठाण्यावरुन या बसगाड्या कर्नाटकातील गुलबर्गा च्या दिशेने रवाना झाल्या. या मजुरांसाठी वाहतूक व्यवस्थेची सोय करण्यापूरताच मर्यादीत न राहता सोनू या बस निघतेवेळीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता. “सध्याच्या खडतर काळात प्रत्येक जणाला आपल्या परिवारासोबत राहण्याचा हक्क आहे. यासाठी मी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांशी बोलून खास परवानगी मागितली आणि या कामगारांना घरी पाठवण्याची व्यवस्था केली आहे.” सोनू सुदने प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून स्वगृही परतण्यासाठी मजुरांची सुरु असणारी पायपीट पाहून सोनूने त्यांच्यासाठी वाहतुकीच्या साधनाची सोय करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या या निर्णयात महाराष्ट्र राज्य प्रशासनाने चांगली साथ दिल्याचंही तो म्हणाला. इतक्यावरच न थांबता आपण, इतर राज्यांतील मजुरांना त्यांच्या मुळ राज्यांत पाठवण्यासाठीही पावलं उचलणार असल्याचा मानस त्याने व्यक्त केला. शिवाय या मजुरांसाठी प्रवासाच्या मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्याची विनंतीही त्याने शासनाकडे केली. अतिशय स्तुत्य असं पाउल उचलल्यामुळे सोशल मीडियापासून कलाविश्वापर्यंत अभिनेता सोनू सूद प्रशंसेस पात्र ठरत आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”