शेडमध्ये सुरु होता जुगार पोलीसांनी टाकला छापा; 8 जणांसह 2 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Borgaon Police News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- बंगळूर महामार्गावर असलेल्या अतीत (ता. सातारा) येथे एका वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेडमध्ये छुप्या पद्धतीने जुगार अड्ड्या सुरु होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये 8 जणांसह 2 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुका हद्दीत अतीत येथे वाघ वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या शेडमध्ये काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना मिळाली. त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी छापा टाकला. यावेळी अजय शिवाजी कारंडे, राजेंद्र महादेव जगताप, प्रदीप कृष्णा यादव, अशोक राजाराम निकम, सुखदेव गणपती निकम, रोहित सुरेश यादव (सर्व रा. अतीत), सतीश संभाजी मोरे (रा. रामकृष्णनगर), निखिल अंगद चव्हाण (रा. आंबळे, ता. पाटण) हे जुगार खेळत असताना आढळून आले.

यावेळी त्यांनी तात्काळ संबंधितांना ताब्यात घेतले. तसेच जुगार अड्ड्यावरून 8 हजारांची रोकड, मोबाईल आणि दुचाकी असा 2 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार राजू शिंदे, राजेंद्र माने, संतोष चव्हाण पोना दादा स्वामी, किरण निकम, राहुल ढोणे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.