सातारा | सातारा जिल्ह्यातील वजनदार व बहुचर्चित असणारे नेते खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. तर त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेत पुन्हा दोन्ही राजे दिसणार आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघांच्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळाले.
खासदार उदयनराजे भोसले यांना सर्व समावेश पॅनेलमध्ये घेण्याबाबत मोठा विरोध केला जात होता. गेल्या दोन दिवसापासून सातारा जिल्हा बँकेचे निवडणुकीविषयी पुण्यात मोठी खलबते झाली. आज सकाळी पुन्हा बैठका झाल्या यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना सर्वसामान्य पॅनेलमध्ये सामावून घेण्याबाबत विरोध राहिला नाही. अखेर उदयराजे भोसले यांची सातारा जिल्हा बँकेत गृहनिर्माण आणि दूध उत्पादक संस्था मतदार संघातून बिनविरोध निवड झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी शांत होतील अशी आशा व्यक्त होत आहे.
सातारा सोसायटी गटातून सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन व सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे दोन्ही बंधू जिल्हा बॅंकेत पुन्हा पहायला मिळतील.