औरंगाबाद – नवरात्रोत्सव होऊन अवघे 24 तास उलटत नाहीत, तर कर्णपुरा यात्रेतील मनाचे बालाजी मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यानी तीन दान पेट्या लंपास केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कर्णपुऱ्यात घडली. या धाडसी चोरीने मंदिरालगतच्या पुजारी तसेच राहिवाश्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रात्री दीड वाजेच्या सुमारास शटरचा आवाज आल्याने कर्णपुरा बालाजी मंदिरा जवळ राहणारे अनिल पुजारी यांना जाग आली. त्यांना घराबाहेर काही लोक असल्याचे जाणवताच त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून आजू-बाजूचे रहिवाशी देखील जागे झाले. सर्वांनी मंदिराकडे धाव घेतली असता मंदिराच्या समोरील चॅनल गेटचे कुलूप तोडलेले होते.तर पाठीमागील दुसरा दरवाजा देखील उघडा होता. तर बालाजी मंदिरातील एक भली मोठी 30 ते35 किलो वजनाची व एक लहान अशी दोन दानपेटी लंपास झाल्याचे दिसले तर बालाजी मंदिरा समोरच असलेले हनुमान मंदिरातिल दानपेटी देखील चोरट्यानी लंपास केल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती पोलिसांना देताच छावणी पोलिसांचे पथक घटनस्थळी दाखल झाले. शिवाय फॉरेन्सिक टीम ला देखील पाचारण करण्यात आले होते. तर श्वान पथक देखील दाखल झाले होते मात्र पाऊस पडल्याने श्वान पथकाची मदत घेतली गेली नाही. पोलीसांच्या विविध पथकाने परिसराची पाहणी केली मात्र चोरी केलेली दानपेटी मिळून आली नाही.
या प्रकरणी मंदिराचे पुजारी यांची दुपारपर्यंत छावणी पोलीस ठाण्यात तक्रार देणे सुरू असल्याने गुन्हा दाखल झालेला न्हवता. कर्णपुरा येथील बालाजी मंदिरात चोरीची ही दुसरी घटना आहे. सुमारे 16 ते 17 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मंदिरात चोरी झाली होती अशी माहिती पुजारी यांनी दिली आहे.