सोलापूर | पंढरपूर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दहा पेक्षा अधिक कोरोना रुग्ण संख्या असलेल्या तालुक्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून चौदा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.
यासंदर्भात येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी आज संबंधित गावातील सरपंच व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी 21 गावांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पुढील 14 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापने व दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. या गावांमध्ये बाहेरगावच्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. याशिवाय कोरोना चाचणी व व्हॅक्सिनेशन मोहीम राबवली जाणार असल्याचेही प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.
मागील 13 ऑगस्ट रोजी पंढरपूर 5 तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता दहा दिवसाच्या कडक लॉकडाऊन नंतर काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानंतरही पंढरपूर तालुक्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा तालुक्यातील 21 गावांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.