मुंबई । खासगी लॅबमध्ये होणाऱ्या कोविड चाचणीच्या दरात तब्बल ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारनं घेतला आहे. कोविड रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. आयसीएमआरनं निश्चित केलेले कोरोना चाचणीचे ४ हजार ५०० रुपये हे शुल्क रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. या निर्देशानुसार ठाकरे सरकारनं चाचण्यांच्या दरात थेट ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं यापुढं खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी साडे चार हजारांऐवजी फक्त २,२०० रुपये मोजावे लागणार आहेत.
यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या शुल्कात सरकारनं कपात केली आहे. हे शुल्क पूर्वी ४५०० रुपये इतके होते, ते आता २२०० रुपये घेतले जाईल. कमी दर निश्चित केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल,’ असं टोपे म्हणाले. कोविड चाचणीचे राज्यातील नवे दर हे देशात सर्वाधिक कमी आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. व्हटीएमच्या माध्यमातून हॉस्पिटलमधून स्वॅब घेतल्यास २२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपये शुल्क असेल. पूर्वी हॉस्पिटलमधून स्वॅब ४५०० शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास ५२०० रुपये इतकं शुल्क रुग्णाला द्यावं लागत होतं असं टोपे यांनी सांगितलं.
खासगी लॅबसाठी नवे दर बंधनकारक असणार आहेत. जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यातील खासगी लॅबशी संपर्क साधून यात आणखी कपात करण्याबाबत चर्चा करू शकतात. मात्र, सरकारनं ठरविलेल्या या दरापेक्षा एक पैसाही अधिक आकारता येणार नाही. तसा प्रयत्न कुणी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा टोपे यांनी दिला आहे. सध्या राज्यात कोविडची चाचणी करणाऱ्या ९१ लॅब आहेत. आणखी पाच ते सहा लॅब लवकरच कार्यरत होतील. नव्या दरांमुळं रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
आयसीएमआरनं सर्व राज्यांना कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारनं हे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश होता. या समितीनं करोना चाचणीच्या सुधारित दरांच्या संदर्भातील अहवाल सरकारकडे सूपुर्द केला होता.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in