तर भारताने समुद्री मार्ग बंद करावा – सुब्रमण्यम स्वामी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
 टीम, HELLO महाराष्ट्र | पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीस बंदी घातल्यानंतर राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. जर, पाकिस्तान भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घालू शकतं तर भारतानेही समुद्री मार्ग बंद करावा असं स्वामी म्हणाले आहेत.

 

भारतानेही अरबी समुद्रातून कराची बंदराकडे जाणाऱ्या बोटींवर बंदी घालावी असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. “नमो सरकारला माझा सल्ला आहे की, जर पाकिस्तान भारतीय विमानांसाठी त्यांची हवाई हद्द बंद करु शकतं तर भारतानेही अरबी समुद्रातून कराची बंदराकडे जाणाऱ्या बोटींवर बंदी घालावी” असं स्वामी यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे. अरबी समुद्राचं नाव बदलण्याबाबतही स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये भाष्य केलं आहे.

दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी भारतासाठी पाकिस्तानची हवाई हद्द पूर्णपणे बंद करण्याच्या विचारात आहोत असं विधान केलं होतं. याशिवाय भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारासाठी पाकिस्तानी रस्त्यांचा वापर केला जातो. त्या वापरावरही बंदी घालण्याचा विचार पाकिस्तानकडून केला जात असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 31 ऑगस्टपर्यंत तिन्ही मार्गांवरुन सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीस बंदी घातल्यानंतर सुब्रमण्याम स्वामी यांनी हे विधान केलं आहे. याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. त्यावेळीही भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने हवाई हद्द बंदी लागू केली होती. ती बंदी मागील महिन्यात उठवण्यात आली होती.

 

 

Leave a Comment