बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावर शिवसेनेतीलच एक गट नाराज होता. त्याच प्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी माकड म्हणून हिणवलेले दिलीप सोपल शिवसेनेत कसे गेले असा सवाल सोशल मीडियाने दिलीप सोपल यांना विचारला आहे.
दिलीप सोपल हे १९९५ साली अपक्ष निवडून आले होते. त्यांनी त्यावेळेच्या सेना भाजप सरकारला पाठिंबा देऊन राज्यमंत्री पद पदरात पाडून घेतले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला त्यांनी राष्ट्रवादीचा हात धरत शिवसेने सोबत गद्दारी केली. याच पार्श्वभूमीवर दिलीप सोपल यांच्यावर टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीप सोपल यांचा उल्लेख माकड म्हणून केले होता. या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आणि सध्या माध्यमात बातमी बनलेल्या या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी सोपल यांचा चक्क माकड म्हणून उल्लेख केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणतात, “सोपल या माकडाला तुम्ही एवढी किंमत देता? तुम्ही मर्द बसलात तर कोण सोपल, आडवा झालाय तिकडं हॉस्पिटलमध्ये. अन्नाची शपथ घेऊन नमक हरामी केलीय त्याने. तुम्ही सगळे फाडणारे मर्द इकडे असताना मी कशाला त्याच्याशी बोलयचं?. धूळ चारा आता त्याला बार्शीची धूळ. त्याला सांगा तू जरी बेईमान असला तरी बार्शीची धूळ इमानदार आहे. इथे गद्दाराना गाडून टाकू आम्ही.” असे बाळासाहेब ठाकरे त्या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.