नवी दिल्ली | देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना काल रात्री उपचारासाठी एम्स रुग्णालयात आणण्यात आले त्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या माघारी पती आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.
जयप्रकाश नारायण यांच्या विद्यार्थी आंदोलनातून सुषमा स्वराज या राजकारणात आल्या होत्या. वयाच्या २६ व्या वर्षी हरियाणा विधानसभेच्या आमदार होऊन त्या त्याच वर्षी हरियाणा मंत्री मंडळात मंत्री देखील झाल्या होत्या. तर त्यांचे पती स्वराज कौशल यांच्या नावावर सर्वात तरुण राज्यपाल होण्याचा विक्रम आहे.
मागील काही वर्षांपासून सुषमा स्वराज या सतत आजारी असायच्या. त्यांना स्वादुपिंडाचा विकार होता. त्यांच्यावर मागील वर्षी स्वादुपिंड रोपणाची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्या आजारातून सावरतात ना सावरतात तेवढ्यात त्यांना हृदयविकाराने गाठले त्यात त्या गतप्राण झाल्या. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने भाजपने धडाडीची महिला नेता गमावली आहे.