पुणे प्रतिनिधी | शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप, श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत असे शरद पवार म्हणाले आहेत. शिवेंद्रराजेंनी मला काल या संदर्भात फोन करून सांगितले आहे. तसेच संग्राम जगताप आणि राहुल जगताप यांनी देखील मला फोन केला होता असे शरद पवार म्हणाले आहेत.
आमच्या पक्षातील लोकांना बळजबरीने पक्ष सोडायला भाग पाडले जात आहे. त्यांच्यावर ईडी आणि अँटीकरप्शन च्या फेऱ्या लावल्या जात आहेत. त्यामुळे काही लोक कारवाहीला भिवून राष्ट्रवादी सोडत आहेत असे शरद पवार म्हणाले आहेत. मुख्यमंत्री स्वतः आमदारांना फोन करून भाजपमध्ये सामील व्हा असे म्हणत आहेत असा गौप्यस्फोट देखील शरद पवार यांनी केला आहे.
आमदार राहुल जगताप आणि शिवेंद्रराजे भोसले हे भाजपमध्ये तर संग्राम जगताप हे शिवसेनेत जाणार असे बोलले जात होते. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपल्या आमदारांवर विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान शिवेंद्रराजे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी शक्यता देखील सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे नेमके काय होणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.