पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. याची कुणकुण लागताच शरद पवार यांनी राजांना भेटीचा सांगावा धाडला. शनिवारी पुण्यात शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंनी दिलेल्या त्रासाचा पाढाच वाचून काढला. त्यावर शरद पवार यांनी मी उद्यनराजेंचे बघतो तुम्ही पक्ष सोडू नका असे आर्जव शिवेंद्रराजेंना केले.
शिवेंद्रराजे आणि शरद पवार यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. या चर्चेत शरद पवार यांनी शिवेंद्रराजे यांना तऱ्हेतऱ्हेनी राष्ट्रवादी सोडू नका असे सांगितले. मात्र शिवेंद्रराजे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते असे बोलले जाते आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणारच हे निश्चित असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. शिवेंद्रराजे यांच्या भाजपमध्ये जाण्याने साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. त्याची जाणीव असल्याने शरद पवार यांना भेटीस बोलावले होते.
शिवेंद्रराजेंनी ३१ जुलै रोजी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य करावा लागेल असा शब्द शरद पावरांना देऊनच शिवेंद्र राजेंनी त्यांचा निरोप घेतला. आता ३१ जुलै रोजी बोलावण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.