मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कुठल्याही आघाडीत सहभागी न होता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मतविभाजनचा फटका बसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला. लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत यावे असे प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांकडून सुरु असतांनाच प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून प्रकाश आंबेडकर हे राजधानी दिल्लीत असून, त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी, वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील व महाराष्ट्राचे नेते गफार कादरी यांच्या उपस्थितीत जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच जागावाटपाचा मसुदा तयार करून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. अशी माहिती आंबेडकर यांनी दिली.
महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून याच निवडणुकीच्या तयारीसाठीची ही बैठक घेण्यात आली. लवकरच विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याने जागावाटपासंदर्भात व भाजप सरकारला रोखण्यासाठी युतीच्या धोरणा संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.